वसमत
शहर प्रतिनीधी
येथील बगाडी माळी गल्ली येथील माळी युवमंच यांच्या वतीने आयोजित क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये बोलत होते. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यावर्षी बगाडी गल्ली येथील माळी युवामंच यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे भव्यदिव्य आयोजन केले होते. या प्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते, विचारवंत, कवी, लेखक डॉ विठ्ठल जायभाये यांनी जवळपास दीड तास महात्मा फुले यांच्या कार्याचा सर्वांगाने आढावा घेतला. ज्योतिरावांचे वाङ्मय समाजाच्या नित्य वाचनात यावे, महिला शिकून सक्षम झाल्या पाहिजेत, सावित्री-ज्योतिबा ही जोडी सर्वांनी आदर्श ठेऊन आपले जीवन ज्ञान संपन्न करावे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यमान आमदार श्री राजूभैय्या नवघरे यांनी समाजाने सभागृह आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा उभारणे याचा नक्की विचार केला जाईल असे आश्वासन दिले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री मा. आ.जयप्रकाश मुंदडा साहेबांनी समाजाच्या सर्वच मागण्या मान्य केल्या जातील, तसेच नव्या पिढीने आपले आदर्श बदलावेत असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ जांबूतकर साहेबांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.बाळासाहेब भिंगोले सरांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कराळे सरांनी केले तर आभार श्री निरपासे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माळी युवामंच अध्यक्ष श्री भोपे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी बगाडी गल्लीतील महिला, पुरुष, आबालवृद्ध मोठया प्रमाणावर उपस्थित होते. व्याख्याना नंतर भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.