ॲड. असीम सरोदे
वसमत-
शहर प्रतिनिधी
अनावश्यक दबाव, नैतिकतेची पायमल्ली होत असेल तर विचार करणाऱ्या नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे. पक्ष हितापेक्षा समाजहिताला प्राधान्य देणे गरजेचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर समाजाला तोडण्यापेक्षा जोडण्यासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन एडवोकेट असीम सरोदे, पुणे यांनी केले. ते लोकायत विचारमंच आणि स्थानिक संयोजन समिती,वसमत यांच्यावतीने आयोजित सहाव्या विवेकजागर परिषदेत चौथ्या सत्रातील प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मा. ॲड. मुंजाजीराव जाधव, मा.आ. पंडितराव देशमुख आणि श्री.अमेय तिरोडकर यांची मंचावर उपस्थिती होती.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आणि लोकशाही मूल्ये या विषयावर बोलताना एडवोकेट सरोदे पुढे म्हणाले की, समाजाने लोकशाहीवर प्रेम केले पाहिजे. भारतीय संविधानाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली पाहिजे. संविधानाची मोडतोड चालणार नाही असे सांगणाऱ्या नागरिकांची गरज समाजाला आहे. सर्वजण कायद्यापुढे समान असले पाहिजेत, हा विचार महत्त्वाचा मानला जावा. लोकशाहीला दाबण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ती अधिक सक्षमपणे उभी राहत असते,असेही त्यांनी यावेळी नमूद केले. सत्य हे अत्यंत महत्त्वाचे मूल्य आहे ते दाबण्याचा प्रयत्न होणे हे अभिव्यक्तिस्वातंत्र्या समोरील महत्त्वाचा प्रश्न आहे. सक्षमांना अधिक सक्षम करण्यापेक्षा उपेक्षित, वंचितांना, गरजूंना सक्षम करणे गरजेचे आहे त्यावरून लोकशाहीचा दर्जा ठरत असतो. संवाद साधण्याची क्षमता विकसित केल्यास आपण अनेकांना लोकशाही मार्गावर आणू शकतो.माणसाची समाजाप्रति संवेदनशीलता असणे अत्यंत महत्त्वाचे असते. केवळ प्रेम दाखवून संवेदनशील राहणे ही बाब सामाजिक समतेसाठी योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
विवेक जागर परिषदेतील चौथ्या सत्रातील दुसरे वक्ते श्री.अमेय तिरोडकर यांनी आजचे समाज वास्तव आणि प्रसारमाध्यमांची भूमिका यावर मार्मिक भाष्य केले. श्री तिरोडकर पुढे बोलताना म्हणाले की, सामान्य माणसांचा आवाज प्रसारमाध्यमांनी उचलून धरला पाहिजे. वातावरणनिर्मितीसाठी प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी सत्य जगासमोर मांडले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. असत्याच्या विरोधात आपणच पत्रकार होणे गरजेचे असून देशात भोंग्यांचे नव्हे तर भुकेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. महागाई, बेरोजगारीचा प्रश्न माध्यमांनी उचलून धरला पाहिजे. परिस्थिती बदलायची असेल तर संभ्रम निर्माण करणाऱ्या माध्यमांवर विश्वास न ठेवता स्वतः माध्यम म्हणून काम करणे गरजेचे आहे.
या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. शारदा कदम यांनी तर आभार श्री. संजय माचेवार यांनी मानले. यावेळी एडवोकेट रामचंद्र बागल, डॉ. एम. आर. क्यातमवार, एडवोकेट रणधीर तेलगोटे, तहसिलदार राम बोरगावकर, डॉ. दिलीप चव्हाण, सुप्रिया गायकवाड, डॉ. किशन बाभुळगावकर, सौ.सीमा भिंगोले,डॉ. रेवती कावळे, प्रा. भगवान फाळके यांच्यासह अनेक मान्यवर व विविध जिल्ह्यातून आलेले प्रतिनिधी उपस्थित होते.