संत नामदेवमहाराज बीए प्रशासकीय सेवा महाविद्यालय
तीन वर्षांचा अभ्यासक्रम: 12 वी नंतर प्रवेश मिळणार
वसमत
शहर प्रतिनिधी
पदवीचे शिक्षण घेत असतानाच अधिकारी (यूपीएससी, एमपीएससी) होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वसमत मध्ये बी ए प्रशासकीय सेवा पदवी अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली असून संत नामदेव प्रशासकीय सेवा पदवी महाविद्यालयात प्रवेशास सुरवात झाली आहे.
प्रत्येक विद्यार्थी मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतो. मात्र पदवी नंतर अधिकारी होण्यासाठी किमान तीन वर्षे वेगळा अभ्यास करावा लागतो. यामध्ये वेळ व पैसा वाया जातो. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या मुलांना अर्ध्यावर तयारी सोडावी लागते. आता मात्र वसमत मध्ये प्रशासकीय सेवा पदवी अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. वसमत येथील बालाजी नगरातील छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठान संचलित संत नामदेव प्रशासकीय सेवा पदवी महाविद्यालयात हा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र शासन व युजीसी मान्यता प्राप्त असून कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक(जि नागपूर) संलग्नित आहे. या अभ्यासक्रमाला 12 वी (कला, वाणिज्य, विज्ञान )नंतर प्रवेश मिळणार असून अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे. 100 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण घेतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करता येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयात सुसज्ज ग्रंथालय असून अधिकारी वर्गाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. शारीरिक क्षमता चाचणी ची तयारी केली जाणार आहे. शिवाय पात्र विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळणार आहे. मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था असणार आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात प्रशासकीय सेवा पदवी अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली असून प्रवेश सुरू झाले आहेत. प्रशासकीय सेवा पदवी अभ्यासक्रमाला मान्यता असणारे एकमेव महाविद्यालय असल्याचे संस्थाध्यक्ष शंकरराव कदम यांनी सांगितले.