वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने अभिवादन
नांदेड
विशेष,
भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हा कार्यालयावर शहीद क्रांतिकारक वीर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर लांडगे, जिल्हासचिव गणेश शिंदे, जिल्हाकोषाध्यक्ष श्याम जाधव, जिल्हासदस्य राजेश पवार यांची उपस्थिती होती.
भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना शहीद ए आझम या उपाधीने सन्मानाने गौरविले जाते. आपल्या जेमतेम साडेतेविस वर्षाच्या काळात ते क्रांतिकारक म्हणून सर्वपरिचित तर होतेच याशिवाय एक प्रसिद्ध लेखक, विचारवंत, पत्रकार , तत्वज्ञानी व व्यासंगी अभ्यासक म्हणून जगातील क्रांतिकारकांच्या इतिहासात त्यांनी मानाचे स्थान मिळविले. ब्रिटीशांच्या अन्याय्य व अत्याचारी राजवटीतून भारताला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या क्रांतिकारकांच्या मालिकेतील मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर जाणार आहे राष्ट्रपुत्र शहीद भगतसिंग राजगुरू व सुखदेव हे जाज्वल्य अभिमान असणारे क्रांतिकारक होते. आजच्या समाजाला परिवर्तनाच्या वाटेवर प्रवास करत असताना भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता इत्यादी मूल्यावर आधारित समाजाची निर्मिती करण्यासाठी सध्या विचाराची आवश्यकता आहे. भगतसिंगानी आपल्या उभ्या आयुष्यात भांडवलशाही, साम्राज्यवाद, धर्मांधता, जातीयता, अनिष्टचाली, प्रथा-परंपरा, व्यसनाधीनता इत्यादी शत्रूंचा जाहीर विरोध केला. हे सर्व शत्रु आजही जशास तसे समाजासमोर उभे आहेत त्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या विचारांची आजही तितकीच गरज आहे. युवकांनी या त्यागाचे प्रतीक असलेले भगतसिंग सुखदेव राजगुरू या राष्ट्रपुत्रांचा आदर्श घेऊन आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष संगमेश्वर लांडगे यांनी केले आहे.