यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम.
हिंगोली
प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक व क्रीडा विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’(एक युवक व एक युवती) व ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’(एक युवक व एक युवती) असे एकूण चार पुरस्कार दिले जातात. क्रीडा व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन इतर युवांसमोर एक आदर्श ठेवणार्या युवा वर्गाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा यामागे उद्देश आहे. पुरस्काराचे यंदाचे २० वे वर्ष आहे.
महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणार्या युवक-युवतींची समाजाला ओळख व्हावी हे या सामाजिक युवा पुरस्काराचे उद्दीष्ट आहे. रु. २१,०००/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय ३१ डिसेंबर २०२० अखेरीस ३५ वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाईटवरुन डाऊनलोड करावे. आपले प्रस्ताव व अर्ज संपूर्ण माहितीनीशी दिलेल्या फॉर्मवर भरुन दि. १ डिसेंबर २०२० च्या आत संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग,मंत्रालयासमोर,मुंबई – २१ या पत्त्यावर,अथवा navmaharashtra@gmail.com या मेल आयडीवर पाठवावेत. या पुरस्कारासंबधी अधिक माहितीकरीता कार्यालयामध्ये (मनिषा खिल्लारे) ०२२-२२०२८५९८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई- आणि नांदेड विभागाच्या वतीने शिवाजी गावंडे , शिवानंद सूरकुटवार आणि नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या राज्य संयोजन समितीने केले आहे.