भटक्यांच्या पालावरशिक्षणाचा उजेड पेरणारा अवलिया
वसमत
शहर प्रतिनिधी
प्रत्येकाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. कुणाला छानपैकी नोकरी, शहरात टुमदार घर असावं वाटतं. तर कोणी सुखा पाठीमागे ऊर फुटेपर्यंत सारखा धावत सुटतो. कोणी रंजल्या गांजल्याच्या मदतीला धावुन जाण्यात त्यांच्या सुखात आपलं सुख शोधत असतो. प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. आपल्या हातात मिळेल तेवढं आभाळ स्वर्ग समजून कृतकृत्य होणारी माणसं आपल्या सभोवताल आढळतात. सुखाचा चतकोर तुकडा समाधानाने आपलासा करण्यात काहींना जिंदगी सापडते. अशी माणसे आपल्या सभोवती भेटतात. त्यापैकीच एक आहेत श्याम रावले सर.
वसमत तालुक्यातील सातेफळ येथे कै.दिनानाथ मंगेशकर माध्यमिक विद्यालयात कार्यरत हिंदी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक श्याम रावले सर.
सुखासीन नोकरी. शहरात टुमदार घर. छान पैकी चाकोरीबद्ध सुखासीन आयुष्य सोडून वसमत शहरालगतच्या भंगार गोळा करणारे, नंदीबैलवाले वैदू, भटक्यांच्या पालावर दररोज शिकवायला जाणारे रावले सर मला कोणत्याही आदर्श शिक्षकांपैक्षा श्रेष्ठ वाटतात. पुरस्कारासाठी, अधिकाऱ्यांच्या वशील्यासाठी धडपडणारे शिक्षक एकीकडे आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय नित्यनेमाने पालावरच्या मुलांची शाळा भरवणारे रावले सर यांची तुलना होऊ शकत नाही. भौतिक सुखापेक्षा अध्यात्मिक किंवा समाधानाची शांत झोप देणारे मानसिक सुख यांचा विचार करता. काहीजण मानसिक सुखाला प्राधान्य देतात. आजच्या या धकाधकीचा धावपळीच्या काळात इतरांच्या अडचणी, समस्या पाहण्यासाठी कोणाला वेळच नाही. परंतू अशा या आधुनिक काळातही श्याम रावळे सरांसारखी काही निर्मोही माणसे तशी विरळच. खरं तर या पालावर जाण्याची त्यांना आवश्यकता काय आहे ? चांगली लाखभर वेतनाची नोकरी आहे. सर्व व्यवस्थित आहे परंतू अंतरी दडलेला संवेदनशिल शिक्षक स्वस्थ बसू देत नाही. श्रीमंताच्या लेकरांना तर कोणीही शिकवायला सहज तयार होईल परंतू कळकट मळकट , चार चार दिवस अंघोळ न केलेली, पोट खपाटीला गेलेली, केसांच्या निबर बटा झालेली, व्यसनाधीन, भंगार गोळा करून चरितार्थ चालवणाऱ्या , अभावात आयुष्य कंठणाऱ्या भटक्यांच्या पालावर शिक्षणापासून हजारो मैल दूर असलेल्या लेकरांना शिकवण्याचा, त्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्याचा जणू सरांनी विड़ा उचलला आहे. कधी वह्या पुस्तके, कधी खाऊ, बिस्कीट, चॉकलेटांचे आमिष दाखवून या लेकरांना शिक्षणाकडे वळवण्याचं काम मागील अनेक वर्षापासून रावले सर करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षण प्रशिक्षण परिषदेकडून बालरक्षक ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे पाला वरच्या चाळीस मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. त्यांना शाळेत प्रवेश देखील मिळवून दिला आहे. त्यांच्या या पालावरच्या शाळेला उपविभागीय शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांनी अनेकदा भेट देऊन सरांच्या कार्याचे कौतुक त्यांनी केले आहे.
अशा या नि:स्पृह, लेकरांबद्दल आत्मीय तळमळ असणाऱ्या समाजसेवकास
पालावरच्या शाळेच्या माध्यमातून, वंचित भटक्या लेकरांच्या आयुष्यात उजेड पेरणाऱ्या श्यामराव रावळे यांना महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात झाला आहे.
त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
– आत्माराम राजेगोरे