भीम आर्मीचे राष्ट्रपतींना निवेदन
वसमत
शहर प्रतिनिधी
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील सातारा या शहरात असणा-या छ. प्रतापसिंह हायस्कूल मध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला. हा दिवस राज्यभर सर्व शाळांमधून विद्यार्थी दिवस साजरा व्हावा यासाठी पत्रकार अरुण जावळे यांनी प्रयत्न केले.
त्यास अनुसरून महाराष्ट्र सरकारने ७ नोव्हेबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून २०१७ ला घोषित केला.
आता हा दिवस भारतभर व्हायला हवा. डॉ. अब्दूल कलाम यांच्या नावाने वाचक दिन देशभर साजरा केला जातो, तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संपूर्ण भारतात विद्यार्थी दिवस साजरा होणं गरजेच असून महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे घेतलेल्या शिक्षणाचा एकंदरीत आलेख पाहता शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी आणि शिक्षकांना त्यापासून प्रेरणा मिळावी ही काळाची गरज आहे.
भारतीय समाजाला जबरदस्त प्रेरणा आणि चालना देण्याच्या दृष्टीने तसेच शालेय शिक्षण चळवळ अधिक गतिमान करण्याच्या हेतूने ७ नोव्हेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजेच ‘विद्यार्थी दिवस हा अत्यंत महत्वाचा ऊर्जादायी दिवस आहे. नवा, समृध्द, शक्तिशाली भारत उभा करायचा असेल, तमाम मागासलेल्या गोरगरिबबांच्या, वंचितांच्या आणि एकूणच सर्व भारतीय समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य धारेत आणायचे असेल तसेच एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे पहायचे असेल तर विद्यार्थी दिवसाचे गांभीर्य व महत्त्व फारच औचित्यपूर्ण ठरणार आहे. आपण आमच्या निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करावा अशी मागणी भीम आर्मीचे मराठवाडा सचिव तथा जिल्हा प्रमुख हिंगोली आनंद खरे, उपजिल्हा प्रमुख ऍड शेख फय्याज, वसमत तालुका संघटक संदीप गायकवाड, तालुका संपर्क प्रमुख पवन हणमंते, वसमत शहर प्रमुख हर्षद आझादे, सामजिक कार्यकर्ते प्रा.निवृती ढेंबरे, देवानंद सोनाळे, राजरत्न भालेराव गजानन गाजरे, मुजांजी गायकवाड यांच्या वतीने करण्यात आली.