हिंगोली
एका कीर्तनकाराने वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथे कीर्तनाच्या माध्यमातून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर संबंधित महाराजांनी माफीनामाही सादर केला होता. मात्र हे प्रकरण उकरून नव्याने वाद उभा केला. दोन समाजात सामाजिक माध्यमांवर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महेंद्र मस्के व वकील रवी शिंदे यांच्या विरोधात शुक्रवारी (दि.२२) रात्री कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत तालुक्यातील भेंडगाव येथे २८ फेब्रुवारी २०२२ रोजी कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु परंपरेविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या कारणावरून काही तरुणांनी मस्के महाराजाला जाब विचारला होता. त्यानंतर महाराजांनी माफीनामा सादर केला होता. मात्र त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी आरोपी महेंद्र महाराज मस्के रा.जवळा ता.पुसद व वकील रवी शिंदे रा. कळमनुरी यांनी संगनमत करून लोकांमध्ये द्वेष निर्माण व्हावा. समाजात अशांतता पसरावी व दंगे घडून यावे याकरीता व्हाट्सअँप, फेसबुक, यूट्यूब या सारख्या सामाजिक माध्यमावर चिथावणीखोर वक्तव्य केले.
समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने टिपण्या व व्हिडिओ बनवून प्रसारित केल्याच्या फिर्यादीवरून आरोपी महेंद्र मस्के व रवी शिंदे या दोघांविरोधात कळमनुरी पोलिस ठाण्यात कलम ५०५ (क) ३४ अन्वये विजय गोविंदराव डाढाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक माध्यमांवर चिथावणीखोर पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने भविष्यात घडणार्या घटनांना चाप मिळणार आहे. दरम्यान याबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने ता.२२ एप्रिल रोजी दुपारी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देवून कारवाईची मागणी करण्यात आली होती. तसेच सामाजिक माध्यमात येणाऱ्या पोस्टला बळी न पडता शांततेचे आवाहनही करण्यात आले आहे.