लेखक
साहेब शिंदे
जिल्हा सचिव, संभाजी ब्रिगेड, परभणी.
मो. 9011407884
संभाजी ब्रिगेड हे देशातील सर्वात बुद्धीजीवी संघटन आहे. हे महाराष्ट्रातील केवळ विचारवंतांनीच नव्हे तर सर्व सामाजिक – राजकीय विश्लेषकांनी, राजकीय पक्षांनीही मान्य केलंय. संभाजी ब्रिगेडची सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक, लढवय्या कार्यामुळे आणि कार्यकर्त्यांमुळे वेगळी ओळख आहे. परंतु आजवर स्वतःचा कुठलाही राजकीय पक्ष नसल्यामुळे इतर राजकीय पक्षांनी याच संभाजी ब्रिगेडच्या लढवय्या कार्यकर्त्यांचा वक्ता म्हणून, लेखक म्हणून, Think Tank म्हणून सोयीनुसार उपयोग करून घेतला. याच लढवय्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या काळात मात्र स्वतःची राजकीय भूमिका म्हणून तथा मतदार म्हणून कोणत्यातरी पक्षाचा झेंडा हाती घेणं भाग होतं. याचाच फायदा उठवत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप किंबहुना भाजप यांसारख्या महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांचा सोयीनुसार उपयोग करून घेतला. यात राष्ट्रवादीने आयता खजिना लुटण्यात आघाडी घेतली. परंतु कोणत्याही राजकीय पक्षाने याच कार्यकर्त्यांच्या सामाजिक भावनांचा आणि संघटनेचा जाणीवपूर्वक विचार केला नाही. याचं कारण म्हणजे संभाजी ब्रिगेडची धास्ती. त्यामुळेच महाराष्ट्रातील हे लढवय्ये संघटन सामाजिक म्हणूनच खितपत पडावं हीच त्यांची भूमिका राहिली. 2016 साली जेव्हा संभाजी ब्रिगेड स्वतंत्र पक्ष म्हणून उदयास आले तेव्हा सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले. याच संभाजी ब्रिगेडचा राजकीय पक्ष म्हणून तिरस्कार करू लागले.
2022 हे साल महाराष्ट्रात राजकीय धामधुमीचा काळ ठरला. शिवसेनेची सत्ता असताना त्तेतलेच मंत्री आणि आमदारांनी फितुरी करत विरोधकांशी घरोबा बसवला. अशा परिस्थितीत दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी संभाजी ब्रिगेडची शिवसेनेसोबत युती झाली. तेव्हा मात्र सर्वच पक्षांच्या बुडाला आग लागली. सर्वांचे धाबे दणाणले. त्याचवेळी महाराष्ट्रात राजकीय समीकरणांनी कात टाकली. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे, मुख्य प्रवक्ते प्रा.गंगाधर बनबरे आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या समन्वयातून महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी प्रबोधनकारी युती झाली. ही युती म्हणजे शिवरायांच्या स्वप्नातलं स्वराज्य उभे करणारी शिवशाही होय. शिव, शाहू, फुले, बाबासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची “सेनाब्रिगेड” देशातल्या पाचही शाह्यांना गाढूण टाकल्याशिवाय राहणार नाही. हीच शिवशाही देशाच्या राजकारणाला वळण देऊ शकते.
संभाजी ब्रिगेड या चळवळीत काम करणारे कार्यकर्ते केवळ बुद्धीजीवीच नाही तर लढवय्ये आहेत. प्रामाणिकपणे घरच्या भाकरी खाऊन राष्ट्रसेवा करणारे देशप्रेमी आहेत. देशातली सर्व विचारपीठे दानानून सोडणारी अभ्यासू विचारवंत आहेत. आपल्या न्याय्य, हक्क आणि मागण्यांसाठी प्रसंगी अत्यंत आक्रमकपणे, सविनय चळवळीच्या मार्गाने, शीस्तप्रिय आणि आदर्श आंदोलने उभी करणारी निर्भीड युवकांची सशक्त फळी म्हणजेच संभाजी ब्रिगेड आहे. ही ओळख कायम आहे. म्हणून संभाजी ब्रिगेडच्या राजकीय एंट्रीने हक्काची Vote bank आणि Think tank हातची निसटणार हेच इतर राजकीय पक्षांचं खरं दुखणं आहे.
संभाजी ब्रिगेड ही मराठा सेवा संघाच्या बाणेदार युवकांची शाखा होय. 1990 साली मराठा सेवा संघाची स्थापना युगपुरूष इंजिनिअर पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली. स्थापनेतच देशातील बहुजनांसाठी धर्मसत्ता, शिक्षणसत्ता, राजसत्ता, प्रचार-प्रसारमाध्यमसत्ता आणि अर्थसत्ता या पाच सत्ता कष्टकऱ्यांच्या हाती गेल्या तरच देशाचा विकास होऊ शकतो. युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या याच भूमिकेतून आणि कल्पनेतून 1995 साली संभाजी ब्रिगेड उदयास आले.
एखाद्या व्यक्तीच्या प्रामाणिक प्रयत्नातून जोडलेल्या कार्यकर्त्यांमुळे संघटन मोठे होते. संघटन मजबूत करण्यासाठी संस्थापकाचा विचार आणि उद्देश शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला तर वेगवेगळ्या स्तरातील माणसं चळवळीशी जोडली जातात. मग तिथे जातपत किंवा धर्म अडथळा ठरू शकत नाही. एक उदात्त विचार घेऊन कार्यकर्ते प्रामाणिकपणे चळवळ चालवतात. तेव्हा त्या संघटनातूनच व्यापक आणि महान कार्य घडू शकते.
एकविसाव्या शतकात काही विचारवंतांनी वेगवेगळ्या संघटनांच्या आणि चळवळीच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रयत्न केले. काहींनी महत्वपूर्ण योगदान दिले. परंतु त्यांनी एकांगी लढा दिल्यामुळे त्यांना दीर्घकालीन यश आले नाही. अशातच 1990 साली एक यशस्वी आणि व्यापक नाव पुढं आलं, ते म्हणजे “मराठा सेवा संघ” नावाची मानवतावादी चळवळ होय. महाराष्ट्रातील पुरुषोत्तम खेडेकर या इंजिनीअरने सोशल इंजिनीअरींग करत निर्माण केलेला हाच ‘मराठा सेवा संघ’ होय. आणि याच मराठा सेवा संघाच्या विश्वासार्हतेचा वारसदार म्हणजे संभाजी ब्रिगेड. संभाजी ब्रिगेड म्हणजे विचाराने विचाराशी, तत्वाने तत्वाशी, बुद्धीने बुद्धीशी आणि कपटाने पाठीमागून वार करणाऱ्या शत्रूचा थेट चौरंगा करून लढणारी लढवय्यी संघटना आहे. महापुरुषांची बदनामी करणाऱ्या कपटी लोकांचे पितळ उघडे पाडणारी संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड होय.
शेतकरी, कष्टकरी, शिक्षित, सुशिक्षित, उच्चशिक्षित, कामगार, नोकरदार तथा बेरोजगार या सर्वच स्तरातील समस्याग्रस्त बहुजन तरुणांच्या न्याय्य हक्काचं हे संघटन आहे. कितीही जागतिकीकरण होत असले तरीही खरा भारत आजही ग्रामीण भागात राहतो. खऱ्या भारतातल्या समस्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही या नव्या इंडियाला कळालेल्या नाहीत. म्हणून देशाचं खरं रुप वेगळं आहे. याची जाणीव देशाचे सच्चे नागरिक म्हणून संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेने करून दिली. भांडवलशाहीच्या घशात जाणारा देश जनतेला दाखवून दिला. मग आजवर देश चालविणाऱ्या राज्यकर्त्यांना हे समजलं नसावं का? तर याचं उत्तर “होय, त्यांना समजलं होतं!” असं आहे. परंतु अज्ञानी जनतेवरच राज्य करता येतं. जनता हुशार झाली तर लोक प्रश्न विचारतील. मग अशी जाब विचारणारी जनता नको. ती पायदळीच असावी ही कपटनीती आजच्या राज्यकर्त्यांची आहे. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसने असेच राज्य केले. परंतु भाजपची नीती याहीपेक्षा अधिक घातक आहे, हे फक्त संभाजी ब्रिगेडनेच सुरुवातीपासून सांगितलेले आहे. भाजप आणि कॉंग्रेस या एकाच नान्याच्या दोन बाजू आहेत. हे अद्यापही भारतीय जनतेला कळालेलं नाही. एक नागनाथ तर दुसरा सापनाथ आहे. एकमेकांना विरोध करत आलटूनपालटून तेच राज्य करतात. जनतेला दाखवण्यापुरते हे दोन विरोधीपक्ष आहेत. परंतु माणसे मात्र तीच आहेत. भांडवलशाहीच्या ताटाखालची मांजरं….. आणखी पाच वर्षांनी लोकांना हेही कळायला लागेल. काही विचारवंतांना ही गोष्ट माहिती असूनही ते उघडपणे बोलत नाहीत. सत्य मांडण्याची ताकद फक्त संभाजी ब्रिगेडमध्ये आहे. संभाजी ब्रिगेडच्या या दूरदृष्टीची प्रचीती आता सर्वच राजकीय पक्षांना यायला लागली आहे. म्हणजेच केवळ सामाजिकच नव्हे तर राजकीय दूरदृष्टीच्या बाबतीतही संभाजी ब्रिगेड देशातल्या सर्व राजकीय पक्षांमध्ये सरस आहे, हेही सिद्ध झालंय. फक्त कोणी आजमावून पाहण्याचा प्रयत्न करू नये. कारण चिकीत्सक, दूरदृष्टीने आणि बारकाईने पहा संभाजी ब्रिगेडने आजवर सांगीतलेली प्रत्येक गोष्ट खरी ठरली आहे. ती इतरांना उशीरा कळाली. केवळ दृष्टी असून चालत नाही तर दृष्टीकोनही असावा लागतो. “ऑन्खे तो सबको होती है, लेकीन नजर सबको नही होती, वो नजर संभाजी ब्रिगेड को है।” इतिहास विसरणाऱ्यांना इतिहास माफ करत नसतो हा इतिहास आहे. संभाजी ब्रिगेडचा हा बुद्धीप्रामाण्यवाद देशाच्या हिताचा आहे, जनतेला जागरुक करणारा आहे, हे त्रिकालाबाधित सत्य येणारा काळच हे सिद्ध करून दाखवेल.
।।जय जिजाऊ।।