नवरत्न मालिका
लिटल किंग्ज शाळेची चौथी माळ
*मुक्ता साळवे यांना*
मातंग समाजातील शिक्षण घेणारी मुक्ता साळवे ही पहिली विद्यार्थिनी. बहुजन समाजाच्या लढ्याविषयी लिहिणार्या त्या पहिल्या दलित लेखिकाही ठरल्या.
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठीची तिसरी शाळा पुण्यातल्या वेताळ पेठेत सुरू केली होती. मात्र, आपल्या मुलींना तिथे शिकायला पाठवण्यास कुणीही तयार नव्हते.
क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांनी मात्र आपली नात मुक्ताला त्यांच्या शाळेत पाठवले. मुक्ता मातंग समाजातील होती.
या समाजाचा शिक्षणाचा हक्क पूर्वीपासून नाकारला गेला होता. त्यामुळे मुक्ता या शाळेतील अस्पृश्य समाजातील पहिलीच विद्यार्थिनी होती. शाळेच्या तिसर्या वर्षी त्यांनी निबंधलेखन स्पर्धेत भाग घेतला आणि ‘धर्म’ या विषयावर निबंध लिहिला.
तो तीन हजार लोकांसमोर वाचून दाखवण्यात आला.
या निबंधात मुक्ता म्हणतात:
‘वेदांचा आधार घेऊन आम्ही खंडन करण्याचा प्रयत्न केला, तर त्यावर स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणार्या या उच्यवर्णीयांना वेद ही आमची मक्तेदारी आहे असे वाटायचे ती केवळ आमची मत्ता आहे. मग आता, जर वेद केवळ त्यांच्यासाठी असतील, तर हे सरळच आहे की ते आपल्याकरिता नाहीत. जर वेद केवळ त्यांच्याच संबंधित असतील, तर हे उघडच आहे की ते आपले धर्मपुस्तक नाही.
आणि जर आपल्यासाठी असे कुठले धर्मपुस्तक नसेल, तर आपल्याला कुठला धर्मही नाही. आपण वेदांप्रमाणे वागण्यास बांधील नाही. आपण वेदांकडे नुसते बघितले, तरी आपल्या हातून घोर पातक घडते, असा ब्राह्मणांचा दावा आहे. असे असताना, वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे वागणे ही मूर्खपणाची परिसीमा नाही काय?’
महात्मा फुले यांनी जातीयता निर्मुलनाच्या उद्देशाने सुरू केलेल्या सत्यशोधक चळवळीचे मुक्ता साळवे यांना जणू बाळकडूच मिळाले होते. या चळवळीचे कार्यकर्ते शब्दशः सत्याचे शोधक होते. बुद्धीप्रामाण्यवादी आणि समीक्षात्मक विचार करण्यावर त्यांचा भर असे.
साळवे यांनी त्याकाळी शुद्र आणि अतिशुद्रांना गुलामासारखी वागणूक देणार्या हिंदू धर्माच्या विरोधात आवाज उठवला.
त्यांनी आपल्या निबंधात शुद्र आणि अतिशुद्रांनाही शिक्षण मिळावे, असा आग्रह धरला. मूठभर लोकांच्या हातात धर्माचे हक्क आणि अधिकार असण्याबद्दल त्यांनी जाब विचारला. धर्माच्या, सनातनी रुढी आणि संस्कृतीच्या नावाखाली बहुजनांना सोसावे लागणारे अत्याचार आणि हिंसेविषयी त्यांनी निबंधात निषेध नोंदवला होता.
‘ज्ञानोदय’ या नियतकालिकाच्या १७ फेब्रुवारी १८५३ रोजीच्या अंकात त्यांचा हा निबंध छापून आला. आजही या निबंधाला भारतभरातील बहुजन चळवळी आणि उठावांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे. गतकाळातील उपलब्ध लिखाणांपैकी दलित लेखिकेने लिहिलेले हेच सगळ्यात आधीचे लिखाण असावे, असे पुरातत्त्वज्ञ ब्रजरंजन मणी यांचे मत आहे.
साळवे दलित चळवळीचा खंबीर आणि प्रभावी आवाज होत्या. त्यांनी भेदभावाला खतपाणी घालणार्या निष्ठूर जातीव्यवस्थेविरोधात लोकांचे प्रबोधन केलेच;
त्याचबरोबर तत्कालिन भारतातील (१९व्या शतकात) स्त्रीपुरुष असमानतेविरोधातही आवाज उठवला. १८५५ साली ‘मांग महारांच्या दुःखाविषयी’ हा लेख त्यांनी लिहिला. या लेखात, बाजीराव पेशवेंच्या काळात महार आणि मांगांना दिली जाणारी भेदभावाची क्रूर आणि अमानवीय वागणूक या विषयाकडे त्यांनी लक्ष वेधले होते. यामध्ये उ्च्चवर्णीयांनी त्यांच्या जमिनी बळकावून स्वतःची घरे बांधणे, त्यांच्या महिलांना प्रसुतीच्या वेळी वैद्यकीय मदत न मिळणे, संरक्षणापुरतेही डोक्यावर छत नसणे यांसारख्या अमानुष अत्याचारांचा समावेश होता.
साळवे यांनी आपल्या कार्यातून हिंदू धर्माच्या नितीनियमांविषयी जाब विचारला. ‘असा कसा धर्म? ज्याविषयी बोलण्याचीही बहुजनांना परवानगी नाही. त्यांनी या धर्माचे नियम पाळणे मात्र बंधनकारक आहे,
छळवणुकीत मांगांना अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण यांसारख्या प्राथमिक गरजांपासून वंचित ठेवणे, अशा अमानुष गोष्टींचा समावेश होता. आणि शुद्रातीशुद्रांचा विकास करायचा असेल, तर केवळ शिक्षणच उपयोगी पडेल, असेही त्यांचे मत होते.
आधी केलेल्या लिखाणाप्रमाणेच त्यांनी ‘मांग आणि महारांच्या दुःखाविषयी’ हा लेखही १८५५ साली ‘ज्ञानोदय’मध्येच सर्वप्रथम छापून आला. ना. वि. जोशीलिखित ‘पुणे वर्णन’ या १८६८ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात, साळवे यांच्या निबंधातील काही भाग आहे. या मराठी निबंधाचा इंग्रजी अनुवाद, सुसी थारु (Susie Tharu) आणि के. ललिता (K. Lalita) यांनी लिहिलेल्या ‘Women Writing in India: 600 BC to Present’ पुस्तकात आहे.
१९९१ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. साळवे यांच्या एकूण लेखनापैकी सध्या एवढेच लिखाण उपलब्ध आहे.
मुक्ता यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. वाईट गोष्ट ही की,
दलित साहित्याचा इतिहास १९५० पासून पुढेच उपलब्ध आहे. म्हणजे मुक्ता साळवे यांच्या कार्याच्या तब्बल एक शतकानंतर. एस. जी. माळी आणि हरी नरके या अभ्यासकांच्या मते, स्त्रियांचा, विशेष करून ब्राह्मणेतर आणि दलित स्त्रियांचा इतिहासातील आवाज दडपण्याच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
आशा थोर मुक्ता साळवे यांना नवरात्रीनिमित्त लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल वसमत ता वसमत जि हिंगोली इयत्ता ……… विद्यार्थिनीच्या वतीने मानाचा मुजरा …..
अन ही चौथी माळ अर्पण