वसमतच्या योगानंद महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा.
वसमत –
शहर प्रतिनिधी.
येथील श्री योगानंद स्वामी महाविद्यालयाच्यावतीने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन व स्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘देशात अच्छे दिनला सुरुवात झाली आहे/ नाही’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर विभागीय पातळीवरील वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन संस्थासचिव डॉ. गोविंदराव इकलवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य श्री. अशोकराव पडोळे हे होते. तर यावेळी श्री. राजेश मंचेवार, डॉ. शशिकांत तोळमारे, डॉ. परशुराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून बोलताना डॉ. इपकलवार म्हणाले की, या स्पर्धेला आदर्श परंपरा असून अशा स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेचा विकास होऊन उत्तम वक्ते घडत असतात. या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या स्पर्धेचे सांघिक प्रथम पारितोषिक रुपये ७००१/ व फिरती ढाल राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर या संघाने पटकाविली. सांघिक द्वितीय पारितोषिक रुपये ५००१/ व स्मृतिचिन्ह बलभीम महाविद्यालय, बीड या संघाला प्राप्त झाले.तर सांघिक तृतीय पारितोषिक रुपये ३००१/ व स्मृतिचिन्ह यशवंत महाविद्यालय, नांदेड या संघाने मिळविले. यासोबतच वैयक्तिक प्रथम पारितोषिक रुपये ३००१/ व प्रमाणपत्र प्रशांत शृंगारे या विद्यार्थ्याला मिळाले. वैयक्तिक द्वितीय पारितोषिक रुपये २००१/ व प्रमाणपत्र साईनाथ महादवाड या स्पर्धकांने मिळविले. तर वैयक्तिक तृतीय पारितोषिक रुपये १००१/ व प्रमाणपत्र प्रतीक्षा मोरे या विद्यार्थिनीने प्राप्त केले.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. बाबुराव खंदारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ.खंदारे म्हणाले की, आपले विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी वक्तृत्व कला अवगत असावी लागते.उत्तम वक्तृत्व असणाऱ्या व्यक्तींना प्रसारमाध्यमे, पर्यटन तसेच विविध व्यवसायात संधी आहे. तसेच समाजाच्या प्रगतीमध्ये वक्ते व विचारवंतांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वादविवाद मंडळाचे प्रभारी डॉ. शशिकांत तोळमारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. काशीनाथ चव्हाण यांनी तर आभार डॉ. परशुराम पाटील यांनी मानले.या स्पर्धेचे उत्कृष्ट परीक्षण डॉ.साहेबराव शिंदे व प्रा. आत्माराम राजेगोरे यांनी केले. यावेळी परीक्षक म्हणून डॉ. साहेबराव शिंदे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.