अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद
वसमत ,
प्रतिनिधी
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी दि. 21 व 22 मार्च 2020 रोजी जिल्हयांतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले होते.त्यांच्या आव्हानाला वसमतकरांनी शनिवारपासूनच अत्यावश्यक सेवा वगळता आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी व्हीसी व्दारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ होत आहे. या विषाणुला रोखण्यासाठी जनतेने स्वयस्फुर्तीने बंद पाळणे आवश्यक आहे , असे त्यांनी आवाहन केले होते
त्याचाच एक भाग म्हणून दि. 21 व 22 मार्च रोजी जनतेने घराबाहेर पडू नये, असे सुचविले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी जिल्हयांतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.सदर दोन दिवसांच्या बंदमधून पुढील आस्थापनांना वगळण्यात आले. यामध्ये शासकीय,निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला व किराणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने व औषधे दुकाने, विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रॉलियम व ऊर्जा संसाधने, प्रसार माध्यमं, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना यांना वगळून जिल्हयांतील सर्व आस्थापना व दुकाने दि. 21 व 22 मार्च 2020 रोजी बंद ठेवावेत, असे आवाहन केले होते.
वसमत शहरात शनिवारी सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त होता. सकाळीच नागरिकांनी भाजी मंडईत भाजीपाला घेण्यासाठी गर्दी केली होती. हळूहळू गर्दी ओसरली. संपूर्ण बाजारपेठेत दवाखाने, औषधी दुकाने व काही किराणा दुकाने सुरू होती. परंतु हॉटेल्स, पान टपरी, व्यापाऱ्यांची इतर सर्व प्रतिष्ठाने संपूर्ण बंद होती. शहरातील प्रमुख रस्त्यावर काही तुरळक दुचाकी व नागरिक प्रमुख रस्त्यावर ये जा करताना दिसत होते. उद्या रविवारी यापेक्षाही नागरिक स्वयंस्फूर्तीने आपापल्या घरात थांबतील असेच चित्र दिसते.
त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे व खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक दिवस जनतेच्या कर्फ्यु या आव्हानाने सर्व स्तरातून नागरिक प्रतिसाद देत आहेत हे विशेष